अग्रलेख : गद्दार विरुद्ध गद्दार!

in #yavatamal2 years ago

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबापुरीत पायधूळ झाडत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेभोवती घालण्यात आलेला वेढा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे! दसऱ्यानंतरच्या काही महिन्यांतच महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर मुंबई महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने सुरू होणाऱ्या महानाट्याची नांदी शहा यांनी एकदम वरच्या पट्टीत गायली, यात शंका नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही केंद्रीय नेत्यांनी उतरणे हे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष किती विकोपाला गेला आहे, याचीच खूण म्हणावी लागेल. शहा यांच्या या मुंबई दौऱ्यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याबाबतच्या हालचाली सुरू होतील, अशी अनेकांची अटकळ होती.मात्र, राज यांना या महानाट्यात नेमकी कोणती भूमिका द्यायची, याची जबाबदारी भाजपने बहुधा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवलेली असावी, असे शिंदे आणि राज यांच्या भेटीगाठींमुळे दिसू लागले आहे. शहा यांनी गणेशदर्शनाच्या निमित्ताने मुंबईवर केलेल्या स्वारीचे खरे लक्ष्य हे अपेक्षेप्रमाणेच शिवसेना आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे हे असल्याचे त्यांच्या तिखट भाषेमुळे सिद्धच झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला फार मोठे भगदाड पाडून, राज्याची सत्ता हस्तगत करण्यात आलेल्या यशानंतर शिवसेनेला भाजप तसेच शिंदे गट यांनी वेढा घालून, उद्धव ठाकरे यांची रसद मारण्याचे प्रयत्न जोमाने सुरू केले आहेत. त्यानंतर शहा यांनी मुंबईत येऊन आपल्या नेतेगणांसमोर जे काही घणाघाती वाक्‍तुषारांचे सिंचन केले, त्यामुळे आता ते या कार्यकर्त्यांना बहुधा बेल-भंडारच उचलायला लावणार, असेच सर्वांना वाटून गेले असणार! केंद्रीय गृहमंत्र्यांनी २०१९ मधील लोकसभा-विधानसभा निवडणुकांपूर्वी ‘मातोश्री’ला चरणस्पर्श करून, उद्धव ठाकरे यांची गळाभेट घेतली होती. त्या भेटीत नेमके काय काय घडले आणि तहाच्या वाटाघाटी कशा झाल्या, याचा साद्यंत वृत्तांत शहा यांनी यावेळी सादर केला. ‘बंद दाराआड झालेल्या दोघांच्या चर्चेत जे काही ठरले होते, तो करार शिवसेनेने मोडला आणि दगाबाजी केली,’ असे शहा यांचे म्हणणे आहे. अर्थात, ती त्यांची बाजू होती आणि ती खरी असू शकते, तशीच खोटीही. मात्र, भाजप कार्यकर्त्यांना शिवसेना विरोधात लढण्यासाठी जोम आणि इर्ष्या निर्माण करण्यास ती पुरेशी होती. शिवाय, महाराष्ट्रातील अन्य महापालिका वा नगरपालिका यांच्यापेक्षाही मुंबई महापालिका हाच भाजपने प्रतिष्ठेचा विषय केल्याचेही त्यामुळे अधोरेखित झाले. मात्र, अमित शहा यांची भाषा ही पूर्णपणे दमबाजीची होती आणि केंद्रीय गृहमंत्रिपद भूषवणाऱ्या नेत्याला तर ती शोभणारीच नव्हती.शिवसेना नावाची मराठी माणसाला १९६० व ७० या दोन दशकांत आधार वाटायला लावणारी संघटना समूळ उखडून काढण्याचे भाजपचे उद्दिष्ट त्यातून उघडे पडले. शिंदे गटाची संभावना शिवसेना पहिल्या दिवसापासून ‘गद्दार’ अशीच करत आली आहे. तर आता शहा यांनी शिवसेनेला तेच विशेषण लावत त्यांना त्याबद्दल ‘शिक्षा’ही सुनावली. ही ‘शिक्षा’ अर्थातच मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातातून कोणत्याही परिस्थितीत हिसकावून घेणे, हीच आहे. विकासाचा सोनेरी मुलामा लावत आणि त्याचवेळी हिंदुत्वाला साद घालत शहा यांनी उद्धव ठाकरे यांना जमिनीवर आणा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. त्यास शिवसेनेने आमची संघटना कायम जमिनीवरच असते, असे प्रत्युत्तरही लगोलग दिले खरे; पण त्यात शिवसेनेचा नेहमीचा जोष दिसला नाही. त्यामुळे शहा यांच्या तोफखान्यामुळे शिवसेना लढाईपूर्वीच गारद तर झालेली नाही ना, असेच चित्र उभे राहिले आहे.एकंदरीतच शहा यांचा आक्रमक पवित्रा हा महाराष्ट्र भाजप नेत्यांनाही दिलेला संदेशच आहे. देवेंद्र फडणवीस व आशीष शेलार यांना ‘सौम्य भाषा का वापरता?’ ही त्यांनी दिलेली तंबी पुरेशी स्पष्ट आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतील भाजपच्या प्रचारमोहिमेचा हा शुभारंभच आहे. अर्थात, त्यापूर्वी होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा हीच खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील लढाईची पहिली फेरी ठरणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा ‘शिवसैनिक’ नेमका कोणाबरोबर आहे, याचा फैसला तिथेच होणार आहे आणि मुंबई महापालिका निवडणुकीचे भवितव्यही तेथेच ठरणार, यात आता शंका उरलेली नाही.एकंदरीतच ऐन गणेशोत्सवात शहा यांनी लावलेल्या या फटाक्याच्या माळेनंतर आता ही निवडणूक होईपर्यंत रोज आपटीबारापासून सुतळी बॉम्बपर्यंत विविध फटाके फुटत राहणार. शिवसेनेविरुद्धच्या या लढाईत आता केवळ शहाच नव्हे तर दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही उतरणार, हे सांगायला कोणा होरारत्नाची गरज नाही. काही वर्षांपूर्वी झालेली हैदराबाद महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केल्यावर मोदी-शहा याच जोडीने प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता मुंबईतही बघायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या भात्यात ‘मराठी माणूस तसेच महाराष्ट्राची अस्मिता’ हेच दोन बाण शिल्लक आहेत. हा पक्ष त्यानिशी भाजप आणि शिंदे गट यांच्याशी कितपत जोमाने लढते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.