पुणे-बंगळूर महामार्गावर खासगी बस उलटली, आठ प्रवासी जखमी

in #yavtmal2 years ago

मलकापूर : मुबईहून-कोल्हापूरला २२ प्रवासी घेऊन निघालेली खासगी बस पुणे-बंगळूर महामार्गावर उलटली. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. या अपघातात बस चालकासह आठजण जखमी झाले आहेत. पुणे-बंगळूर आशियायी महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत आज, सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.विराज विठ्ठल शिंदे (वय २४, रा. चिपळूण), दिलीप तातोबा जाधव (६४ रा. कोल्हापूर), सचिन श्रीमंत भोसले (३७), संजय श्रीमंत भोसले (४२, दोघेही रा. सानपाडा, मुंबई), गजेंद्र मारुती भिसे (३५, रा. कोल्हापूर), तुकाराम महादेव पाटील (४१,रा. मानखुर्द, मुंबई), अझरूद्दिन इलियास अन्सारी (२५,रा.नांदेड) अशी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस (क्रमांक एम.एच-०९-ई एम-४८७६ ) ही मुंबईहून कोल्हापूरकडे २२ प्रवाशी घेऊन जात होती. पहाटेच्या सुमारास बस पुणे-बंगळूर महामार्गावर गोटे गावच्या हाद्दीत आली असता बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दुभाजकाला धडकून बस पलटी झाली. यात २२ पैकी ८ प्रवासी जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, महेश होवाळ, रमेश खुणे, अमित पवार, सलीम देसाई, यांच्यासह महामार्ग पोलिस कर्मचारी लोखंडे व कराड शहर पोलीस ठाण्याचे हवालदार खलील इनामदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. महामार्ग देखभाल व पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक पूर्ववत केली.