बिबट्याची कातडी, चिंकारा अन निलगायीच्या शिंगांची तस्करी; तिघे युवक वनखात्याच्या सापळ्यात

in #yavatmal2 years ago

नाशिक : शहरासह जिल्ह्यात वन्यजीवांच्या अवयवांच्या तस्करीचे चालविले जाणारे छुपे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी पश्चिम वनविभागाने ‘नेटवर्क’ गतीमान केले आहे. एकापाठोपाठ सलग कारवाई करत तस्करांना दणका देण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी (दि.२०) मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या पथकाने बनावट ग्राहक बनून ‘सौदा’ करण्याचे भासवून सापळा रचला. कृषीनगरजवळ तीघा संशयित तरुणांना बिबट्याची संपुर्ण कातडी, चिंकारा, नीलगायीच्या शिंगांसह रंगेहाथ ताब्यात घेतले. या पंधरवड्यात पश्चिम वनविभागाची ही तीसरी कारवाई आहे.

नाशिक पश्चिम वनविभागाच्या नाशिक, इगतपुरी वनपरिक्षेत्राकडून वन्यजीव अवयवांच्या तस्करीचे विस्तारणारे जाळे हटविण्याची मोहिम हाती घेतली आहे. तस्करीची ‘लिंक’ फोडण्यासाठी वनविभागाच्या या दोन्ही वनपरिक्षेत्राच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपले गोपनीय ‘नेटवर्क’ सतर्क केले आहे. गोपनीय माहितीच्याअधारे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या पथकाने सापळा रचला. भदाणे यांनी बनावट ग्राहक बनून त्यांच्याशी संपर्क केला. संशयितांनी कातडीसह शिंगांची छायाचित्रे मोबाईलवर व्हॉटसॲपद्वारे पाठविली. यानंतर शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कृषीनगर-विसेमळा रस्त्यालगत जॉगिंग ट्रॅकच्या परिसरात मंगळवारी ‘सौदा’ करण्याचे निश्चित झाले. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास भदाणे यांनी वनपरिमंडळ अधिकारी, वनकर्मचाऱ्यांचे पथक सज्ज करून साध्या वेशात सापळा लावला. घटनास्थळी पाच संशयित तरुण आले. यावेळी रोकड वनकर्मचाऱ्यांनी त्यांना बॅगेत असल्याचे दाखविले. त्यांच्या ताब्यातून बिबट्याची कातडी व चार शिंगे अलगद हस्तगत केली. तीघेही पदवीचे शिक्षण घेत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. संशयितांविरुद्ध रात्री उशीरापर्यंत वनपरिक्षेत्र कार्यालयात वन्यजीव कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

nskdfi7958t_202209885457.jpg