आमिर खानची बहिण निखत करणार टीव्ही डेब्यू, ‘या’ मालिकेत साकारणार लीड भूमिका

in #yavtmal2 years ago

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिरने या चित्रपटाचं प्रमोशन सुरू केलं आहे आणि अशात त्याची मोठी बहीण निखत (Nikhat Khan ) हिने तिच्या टीव्ही डेब्यूची तयारी सुरू केली आहे. याआधी ‘सांड की आंख’ या सिनेमात आमिरच्या बहिणीला तुम्ही पाहिलं असेलच. आता ती टीव्हीवर पदार्पण करतेय.

स्टार प्लसवरच्या ‘बन्नी चाऊ होम डिलिव्हरी’ या मालिकेतून तिचा डेब्यू होतोय. निखत खान या शोमध्ये लीड रोलमध्ये दिसणार आहे. तिच्याशिवाय राजेंद्र चॉल, उल्का गुप्ता, प्रविष्ठ मिश्रा या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. समाजातील महिला सशक्तिकरणावर आधारित या मालिकेत एका महिलेची कथा दाखवली जाणार आहे. ती स्वत:चा जेवणाचा बिझनेस सुरू करते आणि आपल्या स्कुटरवर डिलिव्हरी देते, अशी याची कथा आहे.

निखत खान ही निर्माता ताहिर खान व जीनत हुसैन यांची मुलगी आहे. तिला आमिर खान, फैजल खान आणि बहिण फरहत खान अशी तीन भावंडं आहेत. तिच्या पतीचं नाव संतोष हेगडे आहे. तिला दोन मुलं आहेत. निर्माती अशी तिची ओळख आहे. 90 च्या दशकातील ‘तुम मेरे हो’ या सिनेमाची ती निर्माती होती. हा सिनेमा तिने तिच्या वडिलांसोबत बनवला होता. 2002 मध्ये आलेल्या ‘हम किसी से कम नहीं’ या सिनेमात तिने कॉस्च्युम असिस्टंट म्हणून काम केलं होतं.