..म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले; भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले

in #yavtmal2 years ago

मुंबई - हिंदुत्व हा आमचा श्वास, ध्यास आहे. भाजपाची स्थापना आरएसएसच्या विचारसरणीतून झालीय. मात्र २०१९ मध्ये युती झाली परंतु निकालानंतर हिंदुत्व मागे पडले आणि खुर्ची पुढे आली. विश्वासघात झाला. ज्यांचा हिंदुत्व अजेंडा नाही. हिंदुत्व ज्यांना मान्य नाही अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून महाविकास आघाडी झाली. छत्रपतींनी मुघलांशी संघर्ष केला. देव, देश आणि धर्मासाठी लढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. सुरुवातीला महाशिवआघाडी नाव दिले परंतु त्यातील शिव काढून टाकला असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी अस्वस्थतेबद्दल उठवलेला आवाज यात प्रत्येक आमदाराचा वैयक्तिक राग होता. अंतर्गत कलहाने हे सरकार पडेल. त्यातून पोकळी निर्माण होईल. तेव्हा पर्यायी सरकार देऊ असं आम्ही सांगितले. विधान परिषदेच्या निकालात १३४ मते भाजपाला मिळाली. संख्याबळ असूनही सत्तेचा मोह नाही. सामान्य हिंदुत्वासाठी लढणाऱ्या आनंद दिघेंचे विचार जपणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. देवेंद्र फडणवीस आणि ५ जणांव्यतिरिक्त हे कुणालाही माहिती नव्हते. हिंदुत्वासाठी त्याग करतो. सत्तेचा मोह आम्हाला नाही. खुर्चीचा मोह नाही. खुर्चीसाठी आम्ही हिंदुत्व सोडलं नाही असा टोला शिवसेनेला लगावला.

तसेच एकनाथ शिंदे शिवसैनिक नाही हे आता सांगता? इतके वर्ष त्यांनी पक्षासाठी त्याग केला. घरोघरी फिरले. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवू. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. एका खऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवले सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मुख्यमंत्री राहिलेला माणूस मंत्री होतो. अशोक चव्हाण पीडब्ल्यूडी मंत्री राहिलेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झालेले पहिलं उदाहरण नाही. प्रशासनाची आवश्यकता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत सहभागी व्हावं लागले. पक्षाचा आदेश आमच्यासाठी सर्वस्व असतो. जे आपल्या मंत्रिमंडळात होते त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी मोठे मन लागते. ते मोठे मन देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलं. राज्याच्या विकासासाठी, हिंदुत्वासाठी काम करणारे सरकार राज्यात आले आहे. आमच्यात अत्यंत सलोख्याची नाती, पक्षासाठी मान कापून द्यायची तयारी याचा ज्यांना हेवा वाटतो त्यांनी अंतर्गत कलह वैगेरे बातम्या पसरवल्या असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.

हिंदुत्वाला विरोध करणारं महाविकास आघाडी सरकार राम मंदिरासाठी निधी गोळा करणाऱ्यांची टिंगल केली. तुम्ही वर्गण्या गोळा करता मात्र आम्ही निधी म्हणतो. कोरोनात मंदिर बंद, दारूची दुकानं सुरू राहिली. मतांसाठी लांगुनचालन हे उद्धव ठाकरेंनी केले. अजानच्या स्पर्धा आयोजित केल्या. मशिदीवरील भोंग्याला विरोध करताना २८ हजारांहून अधिक मनसेच्या कार्यकर्त्याना नोटिसा बजावला. हिंदुत्वाला वेळोवेळी विरोध झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन केला असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.

६५ लाख मेट्रोने प्रवास करतील. वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. नद्यांवर भिंती बांधणार असा दावा केला. एसटीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन मोडून काढलं. शेकडो लोकांवर केसेस झाल्या. ओबीसी आरक्षण घालवण्याचं पाप महाविकास आघाडी सरकारने केले. मराठा-धनगर आरक्षणावर काहीही केले नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी घोषणा केली पण त्याचे पुढे काय झाले? नवीन आलेल्या सरकारनं लोकांच्या अपेक्षा पूर्ण करा, मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो, ऊतू नका, मातू नका घेतला वसा टाकू नका असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.