Maharashtra : अखेर ठरलं! उद्याच होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; पत्रक जारी

in #yavatmal2 years ago

8.jpgMaharashtra Cabinet Expansion : राज्यात एक महिन्याहून अधिक काळ सत्ता स्थापन केल्यानंतरही शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यात सकाळपासून उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याला आता पूर्णविराम लागला असून, शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या सकाळीच होणार असल्याच्या वृत्ताला अखेर दुजोरा मिळाला आहे. याबाबत जनसंपर्क कार्यालयाने पत्रक जारी केले आहे. यात 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.उद्या होणाऱ्या शपथविधीमध्ये भाजपामधून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक यांची मंत्रीपदी वर्णी लागू शकते. तर, शिंदे गटाकडून दादा भुसे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, दीपक केसरकरसदा सरवणकर आदींच्या नावाची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्ली दरबारी जाऊन आले होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून, उद्या कोणकोणत्या मंत्र्यांचा शपथ विधी पार पडतो आणि कुणाला कुठलं खात्याची जबाबदारी दिली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 38 दिवस झाले तरी राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यामुळे विरोधी पक्षांतर्फे अनेकदा राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, या विस्ताराला काही केल्या मुहूर्त मिळत नव्हता. मात्र, विरोधकांसह सामान्य नागरिकांची प्रतीक्षा संपली असून, उद्या नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार असून, गृह आणि अर्थ खातं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.