Hingoli : सरपंच निवडीवरून दोन गटांत तुफान हाणामारी; ​​​​​​40 जणांविरुध्द गुन्हा, 3 पोलिस जखमी

in #pusad2 years ago (edited)


हिंगोली : ग्रामपंचायत निवडणुकीतील (Gram Panchayat Election) निकालानंतर हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli) एका गावात तणावस्थिती निर्माण झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथील रात्री उशीराची ही घटना आहे. निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने एक गट आक्रमक झाला. त्यानंतर दुसऱ्या गटाकडूनही वादास सुरुवात झाली.

औंढा नागनाथ तालुक्यातील (Aundha Nagnath Taluka) चिंचोळी निळोबा इथं ग्रामपंचायतीच्या (Chincholi Niloba Gram Panchayat) 9 सदस्यांसाठी निवडणूक झाली. यामध्ये दोन गटांचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोमवारी औंढा तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यामध्ये रवंदळे गटाचे 5, तर गरड गटाचे 4 सदस्य विजयी झाले. मात्र, सरपंचपदाच्या निवडीमध्ये गरड गटाचा उमेदवार विजयी झाला. सदस्यांचे बहुमत एका गटाकडं तर थेट निवडीतून सरपंच दुसऱ्या गटाचा झाल्याने घोषणाबाजीला सुरुवात झाली. दरम्यान, पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ झुंजारे यांनी गावात जाऊन मिरवणूक न काढण्याबाबत सूचना दिली. त्यानंतरही दोन्ही गटांनी मिरवणूक काढली. त्यातून दोन गट समोरासमोर आल्यानंतर चांगलाच राडा झाला.

दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर एका गटानं पोलिसांवरच दगडफेक केली. यामध्ये पोलिस कर्मचारी रवी इंगोले, वसीम पठाण, राजकुमार कुटे जखमी झाले. त्यानंतर वाढीव पोलिस कुमक मागविण्यात आली. या प्रकरणी 40 जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मंगळवारी पहाटे औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.