Waterfall : जीवापेक्षा फोटो महत्त्वाचा आहे का? पोज द्यायला गेला अन् तरुण धबधब्यात कोसळला

in #yavatamal2 years ago

पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना अनेकांना जीवाला मुकावे लागते. बऱ्याच वेळा असे सेल्फी किंवा फोटो काढताना अनेकांचे जीव जातात. पर्यटनाचा आनंद घेताना किंवा सेल्फी काढतानाच काळाचा घाला अशा अनेक बातम्या आपण ऐकत असतो. दरम्यान, आता अशीच एक घटना तमिळनाडूच्या कोडाईकनालमध्ये धबधब्याजवळ घडली आहे. या धबधब्याजवळ फोटो काढताना २८ वर्षांचा तरुण खाली कोसळला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.खाली कोसळलेल्या तरुणाचा एक मित्र व्हिडीओ शूटिंग करत होता. त्याच व्हिडीओमध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तरुणाचा शोध सुरू केला. मात्र तो सापडला नाही. अजय पांडियन असं धबधब्यात पडलेल्या तरुणाचं नाव आहे. अजय दगडांवर उभा राहून फोटोसाठी पोझ देत असताना त्याचा मित्र कल्याणसुंदरम व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. पोझ देत असताना अजयचा तोल गेला आणि तो खाली कोसळलादरम्यान, ही संपूर्ण घटना कल्याणसुंदरमच्या फोनमध्ये रेकॉर्ड झाली आहे. सध्या हा 47 सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अजय कोडाईकनाल येथील धबधब्याजवळ जाताना दिसत आहे. पुढे ये आणि चांगल्या अँगलनं फोटो काढ, अशी सूचना अजय मित्राला देताना दिसत आहे. धबधब्याची खोली फोटोत दिसावी या हेतूनं अजय मित्राला सूचना करतो. तितक्यात ओल्या दगडांवरून अजयचा पाय घसरतो आणि तोल जाऊन तो खाली कोसळतो. दगडांचा आधार घेऊन अजय स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यात अपयशी ठरतो आणि ३ ते ४ सेकंदांत दिसेनासा होतो.धबधब्यातून कोसळणाऱ्या पाण्याचा वेग जास्त असल्यानं अजय वाहून जाताना दिसत आहे. त्याचा मित्र मदतीसाठी आरडाओरडा करतो. मात्र काहीच उपयोग होत नाही. घटनेची माहिती कल्याणसुंदरमनं पोलिसांना दिली असून त्यानंतर बचाव दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांना बराच वेळ शोधकार्य केलं. मात्र त्यांना अजयला शोधण्यात अपयश आलं आहे. अजूनही शोध सुरुच आहे.