आदीवासी पाड्यांवरील "अबोल' लेकरांची उंच ध्येयासाठी लांब "धाव' !

in #pune2 years ago

स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर मुलांप्रमाणे ते मोकळणेपणाने बोलत नव्हते, चेहऱ्यावरचे हसू देखील तेवढ्यापुरतेच. 8-10 वर्षांची "ती' मुलं-मुली पहिल्यांदाच या स्पर्धेत उतरली होती. थोडीशी कावरी-बावरी झाली असली, थोडी अबोलही असली तर त्यांच्यात एक झकास गुण होता, ते म्हणजे खुप मोठे होण्याचा. हि स्पर्धक मुले होती, पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्‍याचा आदिवासी पाड्यांवर मुक्तपणे खेळणारी, बागडणारी. "आम्ही सगळ्या स्पर्धेत सहभाग घेतो, अनेकदा बक्षिसही मिळवितो. आम्हाला खुप मोठ्ठ व्हायचंय, पुढे जायचयं' त्यांचे हे शब्द त्यांच्या जिद्दीला, संघर्षाला अन्‌ ध्येयाला गवसणी घालत गेली !पालघर जिल्ह्यातील डहाणु तालुक्‍यातील शंकरपाडा, बोर्डी इथल्या आदिवासी पाड्यांवरील मुले या स्पर्धेत उतरली होती. सडपातळ अंगकाठी, बोलण्यात लाजरे-बुजरेपणा, पण धावण्यात मात्र तितकेच चपळ असणाऱ्या या मुलांच्या चेहऱ्यावरील निरागसता नकळतपणे मनात घर करत होती. कोणी 3 किलोमीटर, तर कोणी पाच, दहा किलोमीटर अशा वेगवेगळ्या गटांमध्ये हि 8 ते 10 मुले सहभागी झाली होती. त्यातील बहुतांश मुलांनी आपापल्या गटात हि स्पर्धा वेळेत पुर्ण करुन मेडल मिळविण्याचा मानही पटकाविला होता. स्पर्धेत सहभाग घेण्यापासून ते त्यामध्ये मेडल मिळविण्यापर्यंतच्या प्रवासाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.मॅरेथॉनच्या गर्दीत एका बाजुला उभा असलेल्या त्या चार मुलांकडे कोणाचे लक्ष असण्याचा प्रश्‍नच नव्हता. त्यांच्याशी संवाद साधणे तर दुरच. कोपऱ्यात थांबून आपल्या सहकाऱ्यांची, शिक्षकांची वाट पाहणारी हि मुले वाट पाहत बसली होती. जिदीसा संदिप साबार, रोनित मालव, आसरु बसडा हि शंकरपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीत शिकणारे विद्यार्थी. तर ऋतिका भुजाड हि बोर्डी येथील पु.चित्रे गुरुजी इंग्रजी माध्यम शाळेत पाचवीत शिकणारी विद्यार्थीनी. चारही जणांमध्ये ऋतिका काही प्रमाणात बोलकी, जिदीसा, रोनित व आसरु हे तिघेही अबोल, पण आदिवासी भाषेत काहीतरी सांगण्याची त्यांची धडपड तितकीच वाखणण्याजोगी. ""आम्हाला स्पर्धेत धावण्यास आवडते. आमच्या शाळेच्या मैदानातच आम्ही दररोज सराव करतो. आम्हाला खुप मोठे व्हायचेय. अशा स्पर्धांमुळे आम्हाला संधी मिळते.'' असे ऋतिका सांगत होती. या मुलांच्या यंदाच्या मॅरेथॉनमधील सहभागामुळे त्यांच्या ध्येयाची उंची तर गाठलीच, त्याशिवाय या स्पर्धेलाही गावखेड्यापासून आदिवासी पाड्यापर्यंत पोचविण्यापर्यंतची मोलाची कामगिरीही त्यांनी बजावली.जिदीसा नाशिकमध्ये आली होती अव्वल !शंकरपाड्यावरील जिदीसा हि वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होते. नाशिक येथे झालेल्या एका स्पर्धेत तिने अव्वल क्रमांकही पटकाविला होता. "पुणे हाफ मॅरेथॉन' स्पर्धेत चौघांनीही पहिल्यांदाच सहभाग घेतला होता, पुढच्या वर्षीही या स्पर्धेसाठी नक्की येणार, असा शब्द द्यायलाही हि मुले विसरली नाहीत.