ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी विशेष योजना : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

in #yavtmal2 years ago

अमरावती : अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. ग्रामीण भागातील रस्ते पुनर्निर्माण कामाला गती मिळावी, यासाठी लवकरच सरकारकडून विशेष योजना सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण रस्त्यांचा विकास केला जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी (ता. ७) येथे केले.अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी ते येथे आले होते. प्रसार माध्यमांशी बोलताना श्री. फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासनाने आता पालकमंत्र्यांची नियुक्ती केल्यानंतर नियोजनाच्या कामावरील स्थगिती उठविली असून, प्रत्येक ठिकाणी पालकमंत्र्यांकडून नियोजनाचा अभ्यास करून नंतरच ती कामे मार्गी लावली जातील. शिवाय, ज्या अनावश्यक कामांवर निधी देण्यात आला आहे, त्यांची तपासणी करून हा निधी आवश्यक कामांकडे वळता केला जाणार आहे. मेळघाटातील सौरऊर्जेवरील २४ गावांमध्ये तातडीने विद्युतीकरण करण्यासाठी येत असलेल्या अडथळ्यांची पूर्तता येत्या १५ दिवसांत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.