मोठी घडामोड, 'सागर' बंगल्यावर दोघांमध्ये तासभर खलबतं; चर्चांना उधाण

in #yavatmal2 years ago

राज्यात आता महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या संघटनेला बळकटी देण्याच्या कामाला लागलेला आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील आता मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सागर' या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तासभर खलबतं झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाची बाब अशी की या भेटीबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

शिवसेनेत फूट पडल्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीतील अस्थिर राजकीय वातावरणाचा पक्षाला कसा फायदा होईल यासाठी मनसेकडून प्रयत्न केले जात असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच आगामी निवडणुकीत भाजपासोबतच्या युतीबाबतची चाचपणी केली जात आहे का आणि यासाठीच आजची भेट गुप्त ठेवण्यात आली होती का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

राज ठाकरे यांच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर राज ठाकरेंनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही काळ आराम केला. फडणवीसांनी राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी 'शिवतीर्थ'वर जाऊन त्यांची भेट घेतली होती. राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर आता राज ठाकरेंनी 'सागर' बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

new-project-2022-08-29t123337.918_202208874626.jpg