नुकसान रशियाचं, पण धक्का भारताला; T-90M च्या थेट शिकारीनं वाढली चिंता

in #yavtmal2 years ago

कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही युद्ध थांबण्याचे संकेत मिळत नाहीत. गेल्या दोन महिन्यात युक्रेनचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. युक्रेनसोबतच रशियालादेखील युद्धाची मोठी किंमत मोजावी लागली आहे. रशियाची अनेक विमानं आणि रणगाडे युक्रेनच्या लष्करानं जमीनदोस्त केली आहेत.

दोन महिन्यांच्या युद्धात रशियाला सर्वात मोठा धक्का आज बसला. रशियन लष्कराच्या ताफ्यातील टी-९० एम रणगाडा युक्रेनच्या सैन्यानं उद्ध्वस्त केला. टी-९० एम रणगाडा अत्याधुनिक मानला जातो. युक्रेननं रशियाचा रणगाडा उद्ध्वस्त केला असला तरी त्याचा धक्का भारतालादेखील बसला आहे. कारण भारतीय लष्कर मोठ्या प्रमाणात या रणगाड्याचा वापर करतं.

रशियाची निर्मिती असलेल्या टी-९० एम रणगाड्यामध्ये स्वयंचलित सुरक्षा यंत्रणा आहे. शत्रू सैन्याच्या रणगाड्यानं हल्ला केल्यास ही यंत्रणा कार्यान्वित होते आणि रणगाड्याचा बचाव करते. युक्रेनच्या सैन्यानं एक ड्रोन फुटेज जारी केलं आहे. त्यात टी-९० एम रणगाडा उद्ध्वस्त होताना दिसत आहे. या रणगाड्याची किंमत ३९ कोटी रुपये आहे. युक्रेनी सैन्यानं रशियाची थर्मोबेरिक रॉकेट यंत्रणादेखील उद्ध्वस्त केली आहे.

युक्रेनी वर्तमान कीव्ह इंडिपेंडंटच्या पत्रकार इलिया यांनी ४ मे रोजी एक फोटो शेअर केला. त्यात रशियाच्या टी-९० एम रणगाड्याचे अवशेष दिसत आहेत. युक्रेनच्या ईशान्य खारकीव्ह ओब्लास्ट परिसरात टी-९० एम रणगाड्यावर थेट हल्ला झाला. रशियन लष्करातील अत्याधुनिक रणगाड्याला लक्ष्य केल्यानं युक्रेनी फौजेचं मनोबल उंचावलं आहे. रशियन लष्कराकडे १०० टी-९० एम रणगाडे आहेत.