रायगडमध्ये सापडलेली ती संशयास्पद बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची, देवेंद्र फडणवीस यांनी

in #yavtmal2 years ago

मुंबई - मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात दोन संशयास्पद बोटी सापडल्याने खळबळ उडाली होती. या बोटींमध्ये एके-४७ सह काही शस्रास्त्रे सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, ही बोट समुद्रात भरकटून रायगडच्या किनाऱ्यावर आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बोटीबाबत सभागृहात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर आलेली ही बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची असल्याचे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

रायगडमध्ये सापडलेल्या संशयास्पद बोटीबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, समुद्रात संशयास्पद बोट आढळल्यानंतर हायअलर्टचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या बोटीचे नाव ईडीहार्ट असून, सदर बोट ही ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची आहे. या महिलेचे पती स्वत: या बोटीचे कप्तान असून, ती बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती. २६ जून रोजी सकाळी या बोटीचे इंजिन निकामी झाले आणि खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. दुपारी एका कोरियन युद्धनौकेने या खलाशांची सुटका करून त्यांना ओमानकडे सुपुर्द केले. समुद्र खवळलेला असल्याने इडिहार्ड या नौकेचे टोईंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहांमुळे ही नौका भरकटत हरिहरेश्वरच्या किनाऱ्याला लागली, अशी माहिती भारतीय कोस्टगार्डकडून देण्यात आली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

दरम्यान, या घटनेमुळे महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे.

राज्यात समुद्र किनारी जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून मुंबईतही ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. कुणीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यात त्याबाबत तात्काळ पोलिसांना कळवण्याचं आवाहन प्रशासनाने दिले आहे. कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख रायगडच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्याची गुप्तचर यंत्रणा केंद्राशी समन्वय साधत आहे. राज्याला जी जी मदत हवी आहे ती केंद्राकडून पुरवली जात आहे. या संपूर्ण परिस्थितीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत.