उदयोन्मुख युवा जलतरणपट्टू आर्यनची चमकदार कामगिरी: चार महिन्यात १२ सुवर्ण पदकांची कमाई

in #yavtmal2 years ago

उरण : उरण तालुक्यातील युवा जलतरणपटू आर्यन विरेश मोडखरकर (१६) याने विविध जलतरण स्पर्धांमधून ४ महिन्यात तब्बल १२ सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. उरण शहरातील बोरी गावात राहणाऱ्या आर्यनने जलतरणाच्या सरावाची अगदी लहान वयातच सुरुवात केली होती. त्यानंतर जलतरणाची आपसूकच आवड निर्माण झाल्याने पुढील प्रवासाला सुरुवात झाली.पालकांनीही आर्यनची आवड ध्यानी घेऊन त्याला पोहण्याचे धडे गिरविण्यासाठी त्याला प्रशिक्षकाकडे सुपुर्द केले.

प्रशिक्षक हितेश भोईर यांनीही त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन त्याला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त केले. लहान वयोगटामध्ये उत्तम कामगिरी करत असताना कोरोना महामारीचे संकट ओढवले. यानंतर दोन वर्षे सराव पूर्णतः बंद होता. मात्र लॉकडाऊन संपुष्टात आल्यानंतर पुन्हा सुरू झालेल्या सरावावेळी कमी वेळात जास्त सराव करून आर्यन व त्याच्या प्रशिक्षकाने घेतलेल्या अविरत मेहनतीला लवकरच फळ मिळाले आहे. मागील ४ महिन्यात विविध जलतरण स्पर्धेत सहभागी होत त्याने तब्बल १२ सुवर्ण पदके मिळवली आहेत. यामध्ये तीन राष्ट्रीय आणि दोन आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदकांचा समावेश आहे.

ऑगस्ट २०२२ मध्ये पनवेल कर्नाळा स्पोर्ट्स येथे झालेल्या तिसऱ्या इंव्हीटेशनल डिस्ट्रिक्ट लेव्हल स्विमिंग स्पर्धेमध्ये ५० मी. फ्रिस्टाईल- प्रथम, ५० मी. बॅक्स्ट्रोक- प्रथम आणि ५० मी. बटरफ्लाय- प्रथम अशी तीन सुवर्ण पदक मिळवली. यानंतर १५ ऑगस्ट २०२२ उरण नगरपरिषद जलतरण तलाव येथे झालेल्या "आमदार चषक" विविध प्रकारच्या जलतरण स्पर्धेमध्ये ५० मी. फ्रिस्टाईल- गोल्ड, ५० मी. बॅकस्ट्रोक -गोल्ड, ५० मी. बटरफ्लाय- गोल्ड आणि चॅम्पियन ट्रॉफीचा मान मिळवला. तर १८ सप्टेंबर २०२२ ला इंदौर, मध्यप्रदेश येथे "संयुक्त भारत खेल फाउंडेशन" आयोजित ७ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये त्याने चमूचे नेतृत्व केले होते.

५० मी. फ्रिस्टाईल, ५० मी. बटरफ्लाय आणि १०० मी. फ्रिस्टाईल या तीन प्रकारात तीन सुवर्ण पदके मिळवून २२ सप्टेंबर २०२२ "विजय विकास सामाजिक संस्था" आयोजित रायगड जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेमध्ये ५० मी. फ्रिस्टाईल प्रकारामध्ये सुवर्ण पदक मिळवले. यानंतर १८ नोव्हेंबर २०२२ रोजी नेपाळ पोखरा येथे झालेल्या "संयुक्त भारत खेल फाउंडेशन"च्या ७ व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील जलतरण स्पर्धेमध्ये सहभाग घेत चमूचे नेतृत्व केले. यामध्ये ५० मी. बटरफ्लाय आणि ५० मी. फ्रिस्टाईल या जलतरण प्रकारात दोन सुवर्ण पदकांची कमाई करत आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंदविले आहे. त्याच्या या चार महिन्याच्या प्रवासात त्याने तब्बल १२ सुवर्ण पदके मिळवली आहेत.यामध्ये तीन राष्ट्रीय आणि दोन आंतरराष्ट्रीय पदकांचा समावेश आहे. त्याच्या या चमकदार कामगिरीमुळे उरणचे नाव राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवले आहे.त्याच्या या यशाचे सारे श्रेय तो आपले आई-वडील आणि प्रशिक्षकांना देत आहे.

भविष्यात राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या विविध मोठ-मोठ्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील होणाऱ्या मोठ-मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन ठसा उमटविण्याचा त्याचा मानस आहे.आपल्या नावाबरोबरच गाव,राज्य आणि देशाच्या नावलौकिक मिळविण्याचे आर्यनचे स्वप्न आहे.