दिल, दोस्ती : मैत्रीची उत्तम केमिस्ट्री

in #yavatmal2 years ago

अंशुमन विचारे, उदय नेने

मराठी रंगभूमी असो ,मालिका असो किंवा रिॲलिटी शो, या सर्वांमधून आपल्या परिचयाचा झालेला अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. तो उत्तम निवेदकही आहे आणि मुख्य म्हणजे ‘सिंगिंग स्टार’ सारख्या कार्यक्रमातून त्याने एक गायक म्हणून आपले कौशल्य दाखवले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील त्याचे सादरीकरण खूप गाजले होते. ज्याप्रमाणे रंगभूमी हे करिअरचे महत्त्वाचे माध्यम आहे, तसेच जाहिरात क्षेत्रात आणि अभिनय क्षेत्रात उदय नेने हे नाव देखील आपल्या परिचयाचे आहे. उदयने शाहरुख खान, दीपिका पदुकोण अशा अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींबरोबर जाहिरातीत काम केले आहे. सिंघम रिटर्न्स, लाल इष्क, पोस्टर बॉईज, सत्यमेव जयते या चित्रपटात त्याच्या भूमिका आहेत.

उदय आणि अंशुमन या दोघांनी पोस्टर बॉईजमध्ये एकत्र काम केले होते. आता अनेक वर्षांनी ते ‘वाकडी तिकडी’ या मराठी नाटकाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. हे नाटक श्रमेश बेटकर याने लिहिले आहे. तर दिग्दर्शन श्रमेश बेटकर आणि अंशुमन विचारे या दोघांनी केले आहे. या नाटकात अंशुमन विचारे आणि उदय नेने यांची अभिनयातील भन्नाट केमिस्ट्री आपण अनुभवू शकतो. उदय नेने आणि अंशुमन यांच्या पहिल्या संभाषणाचा किस्सा उदयने सांगितला. तो म्हणाला, ‘आमची एकांकिका आय.एन.टी.च्या फायनलला आली होती आणि जो स्लॉट आम्हाला मिळाला, त्या वेळेत आम्हाला आमच्या परीक्षांमुळे प्रयोग करणे शक्य नव्हते. अंशुमन विचारे दिग्दर्शित एक एकांकिका उशिराच्या स्लॉटमध्ये होती. मी अंशुमनला फोन करून आमच्या स्लॉटला तुम्ही एकांकिका केलीत आणि तुमच्या स्लॉटला आम्ही केली तर चालेल का? असे विचारले. अंशुमन सिनिअर दिग्दर्शक असूनही लगेच तयार झाला. त्यावेळेपासून अंशुमन बद्दल मनात आदर निर्माण झाला.’

पुढे योगायोगाने अंशुमन आणि उदय यांनी ‘पोस्टर बॉईज’ चित्रपटात एकत्र काम केले होते. हळूहळू त्यांच्यातील मैत्री वाढली. ‘वाकडी तिकडी’मधील भूमिकेसाठी उदय नेनेचे नाव अंशुमनच्या बायकोनेच म्हणजे पल्लवीने सुचवले. पल्लवी आणि उदय यांनी एका प्रोजेक्टमध्ये एकत्र काम केले होते. उदयबद्दल अंशुमन म्हणाला, ‘उदय एकदम आनंदी माणूस आहे, कधीच कसले टेन्शन घेत नाही. त्याच्याबरोबर वावरताना आपल्याला कायम सकारात्मक ऊर्जा मिळते.जाहिरात क्षेत्रात त्याने उत्तम यश मिळवले आहे. तो एक माणूस म्हणून देखील उत्तम आहे.’

अंशुमनने ‘वाकडी तिकडी’च्या तालमीच्या वेळचा एक किस्सा सांगितला. अंशुमन म्हणाला, ‘मी या नाटकात दिग्दर्शक या नात्याने सर्वांच्या भूमिकेचा नेमका आलेख सेट करत होतो, मात्र हे करताना मी माझ्या व्यक्तिरेखेला अजून चांगले सेट करणे आवश्यक होते. तेव्हा उदयने मला स्पष्टपणे सांगितले की अंशू,या नाटकात तुझ्या भूमिकेलाही अजून चांगल्या पद्धतीने सेट कर. हा त्याचा स्पष्टवक्तेपणा मला आवडला.’

अंशुमनच्या दिग्दर्शनाविषयी उदय म्हणाला, ‘अंशुमन या क्षेत्रात वीस वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहे. एवढा प्रदीर्घ अनुभव असतानाही तो सहकलाकारांना ज्या प्रकारे मैत्रीपूर्ण नात्याने वागवतो, ते खूप महत्त्वाचे आहे. समोरच्या कलाकारालाही प्रत्येक दृश्यात योग्य वाव देणे, हे त्याच्याकडून शिकण्यासारखे आहे. प्रत्येक कलाकाराला दिग्दर्शक या नात्याने त्याने दिलेले स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. तो चिडचिड करत नाही, हा त्याचा आणखी एक गुण.’

‘वाकडी तिकडी’ नाटकाची सरळ रेषेत चाललेली वाटचाल आता सुवर्ण महोत्सवी प्रयोगापर्यंत पोचली आहे.