मोदी-शाहांची नवी खेळी; माजी शिवसैनिकाला मिळणार उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी?

in #yavatmal2 years ago

नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणात विविध बदल पहायला मिळत आहेत. त्यातच आता आणखी एक महत्वाची बातमी समोर आलीय. राजकारणात धक्कातंत्राचा अचूकपणे वापर करण्यासाठी प्रसिद्ध असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एक नवा डाव खेळला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात भाजपनं पाठबळ पुरवल्यानं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरुद्ध बंडखोरी करून ठाकरे सरकार पाडलं होतं.त्यानंतर आता भाजपकडं (BJP) जादा आमदारांचं संख्याबळ असतानाही मोदी-शाह जोडगोळीनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. या सगळ्यातून आगामी काळात शिवसेनेला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा डाव मोदी-शाह जोडगोळीनं आखलाय. यादृष्टीनं आता मोदी-शाह यांच्याकडून आणखी एक डाव टाकला जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपकडून सुरेश प्रभू (Suresh Prabhu) यांना रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे.माजी केंद्रीय मंत्री राहिलेल्या सुरेश प्रभू यांनी गुरुवारी रात्री दिल्लीत (Delhi) अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर सुरेश प्रभू यांनी अमित शहा यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो ट्विट केला होता. त्यामुळं भाजपकडून सुरेश प्रभू यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली जाऊ शकते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रभू यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपला. त्यांनी निवडणुकींच्या राजकारणातूनही निवृत्ती घेतलीय. सुरेश प्रभू यांनी 1996 मध्ये तळकोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या (Shiv Sena) तिकीटावर पहिल्यांदा निवडणूक लढविली.1998, 1999 या सालच्या लोकसभा निवडणुकीतही ते विजयी झाले. १९९८ साली अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते वने व पर्यावरण खात्याचे मंत्री होते. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुरेश प्रभू नद्याजोड प्राधिकरणचे अध्यक्ष होते. २००९ मध्ये तत्कालीन काँग्रेस नेते निलेश राणे यांनी सुरेश प्रभू यांना सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पराभूत केलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सुरेश प्रभू यांना राज्यसभेची उमेदवारी देत त्यांना भाजपमध्ये आणत सर्वांनाच धक्का दिला होता. आता भाजप उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही सुरेश प्रभू यांना रिंगणात उतरवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.