औरंगाबाद : आषाढी एकादशीसाठी लालपरी सज्ज

in #yavatmal2 years ago

औरंगाबाद : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने रविवारपासून बससेवा सुरू केली आहे. औरंगाबाद विभागातील विविध आगारांतून १४५ बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून तीन तर सिडको बसस्थानकातून तीन अशा एकूण सहा बस पंढरपूरकडे भाविकांना घेऊन रवाना झाल्या आहेत. तर अन्य बसस्थानकातून भाविकांसाठी सोमवारपासून बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

पंढरपूर येथील विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी मराठवाड्यासह राज्यातील विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणात जातात. यासाठी औरंगाबाद विभागातून १४५ बस सोडण्याचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार आज मध्यवर्ती बसस्थानकातून पंढरपूरकडे भाविकांना घेऊन तीन बस रवाना झाल्या आहेत.

दोन बस नगरमार्गे तर एक बस बीड मार्गे रवाना झाली आहे. प्रत्येक बसमध्ये १५ ते २० भाविकांची संख्या होती. पंढरपूरला जाणारे भाविक रस्त्यात भेटले तर त्यांना या बस पंढरपूरला घेऊन जाणार आहे. पहिल्या दिवशी मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकातून तीन-तीन अशा एकूण सहा बस भाविकांना घेऊन रवाना झाल्या आहेत.

अशी असेल जिल्ह्यातील बससेवा

एसटी महामंडळाने करमाड, शेकटा, फुलंब्री, खुलताबाद, वेरूळ, बाजार सावंगी, पैठण, बिडकीन, पाचोड, सिल्लोड, आळंद, पाथरी, भराडी, गोळेगाव, अजिंठा, कारखाना, नाचनवेल, वैजापूर, देवगाव रंगारी, शिऊर, कन्नड, पिशोर, औराळा, नागद, चिंचोली लिंबाजी, गल्लेबोरगाव, गंगापूर, लासूर, सिद्धनाथ वाडगाव, मांजरी, सोयगाव, फर्दापूर बसस्थानकातून सोमवारपासून बस सोडण्यात येणार आहे.